Uncategorized

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा ध्वजारोहणात भव्य बँड संचलन व प्रदर्शन

खोपोली – प्रतिनिधी

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्हा शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात उत्कृष्ट बँड संचलन व बँड प्रदर्शन सादर करून उपस्थित मान्यवरांचे व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

दि. 26 जानेवारी 2026 रोजी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेल्या रायगड जिल्हा शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री मा. नामदार भरतशेठ गोगावले, आमदार मा. महेंद्रजी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र शिर्के व रविंद्र शेळके, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

दिनांक 23 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 19 व्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या स्काऊट-गाईड बँड पथकाने महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना बँड संचलनाद्वारे मानवंदना दिली होती. तसेच राष्ट्रीय बँड स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ‘अ श्रेणी’ प्राप्त केल्याबद्दल या बँड पथकास रायगड जिल्हा मुख्य संचलन कार्यक्रमात राष्ट्रध्वज व मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी आणि बँड प्रदर्शन सादर करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

या प्रसंगी राष्ट्रीय जांबोरीतील उल्लेखनीय यशाबद्दल स्काऊट – गाईड विद्यार्थी, शिक्षक व शाळेचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विविध संचलन पथकांसोबत स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलन व आकर्षक बँड डिस्प्लेमुळे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

राष्ट्रीय जांबोरीमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाळेच्या एकूण 25 स्काऊट-गाईड विद्यार्थी व 3 शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

या यशामागे रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्था, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्री. महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त स्काऊट-गाईड मा. सौ. ललिता दहितुळे, उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा आयुक्त स्काऊट मा.सुनील भोपळे, उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा सेक्रेटरी स्काऊट-गाईड मा. संतोष शेडगे, जिल्हा संघटक गाईड मा. सोनाली, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, व्यवस्थापक सिस्टर ज्युली मारिया, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त मा. गायकवाड व मा. डफळ, जिल्हा कार्यालयीन मा. पूनम व मा. दाते, बँड मास्टर मा. राजेश यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या संचलनात सहभागी स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांसह रायगड जिल्हा संघ प्रमुख तथा स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, स्काऊट मास्टर समीर शिंदे व गाईड कॅप्टन सरिता बडकूल यांनी विशेष योगदान दिले.

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या स्काऊट-गाईड पथकाने शिस्त, देशभक्ती व सांघिक कौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडवत रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Raigad Aaple Sarkar News

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : योगेश बबन वाघमारे मो.8928792855 9226391271

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button